साहित्याचं सार जपण्याची कला - उमा शिरोडकर यांची मुलाखत
- bilorijournal
- Apr 26
- 6 min read
मराठी अनुवाद - सई पवार
बिलोरी जर्नल - तुमच्या मते, आजच्या समाजात, अनुवादकाची भूमिका काय आहे? अनुवादाद्वारे सामाजिक घडामोडींवर प्रभाव पाडण्याची ताकद अनुवादकाकडे आहे का?
उमा शिरोडकर - अनुवादक म्हणून, आपण भाषा, संस्कृती आणि जग यांच्यातील दुवा आहोत, आणि ही जबाबदारी म्हणजे काही छोटी बाब नव्हे. अनुवाद करताना आपण कायम अनेक निर्णय घेत असतो - लेखकाचा हेतू व्यक्त करणारे योग्य शब्द निवडण्यासाठी आपण खूप विचार करत असतो. आपला अनुवाद आणि त्याचबरोबर लेखकाचा आवाज कसा आणि कितपत समाजापर्यंत पोहोचतो हे या निर्णयांवर अवलंबून असते. तर हो, अनुवाद ही एक मोठी जबाबदारी आहे आणि एखादं लिखाण, एखादा समुदाय किंवा धर्म यांच्याकडे कशा पद्धतीने पहिलं जातं यावर अनुवादित लिखाणाचा महत्वाचा परिणाम होऊ शकतो. म्हणूनच अनुवदकाने कायम जागरूक असले पाहिजे. अनेकांची समजूत असते की अनुवाद हा फक्त एका शब्दाच्या जागी दूसरा शब्द ठेवण्यापुरता दुसऱ्या मर्यादित आहे पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. अनुवादाचा परीघ त्याहून अधिक मोठा आहे. "शब्दांमध्ये शक्ती असते" याचे याअधिक चांगले उदाहरण मला आठवत नाही.
डिकोलोनायझेशन/निर्वसाहतवादाच्या विचारविश्वामध्ये साहित्यिक अनुवाद कुठे मोडतो? डिकोलोनायझेशन/ निर्वसाहतवादाच्या प्रक्रियेसाठी अनुवाद हे साधन म्हणून वापरता येऊ शकेल का?
प्रसिद्ध स्पॅनिश अनुवादक एडिथ ग्रॉसमन, त्यांच्या २०१० च्या "व्हाय ट्रान्सलेशन मॅटर्स" या निबंधात म्हणतात, "दुसऱ्या समाजातील किंवा दुसऱ्या काळातील लोकांचे विचार आणि भावना समजून घेण्याची आपली क्षमता अनुवादीत साहित्य वाचण्याने वाढते. आपल्याला परक्या वस्तूंचे परिचित गोष्टींमध्ये होणारे रूपांतर पाहण्याची संधी तसेच थोड्या वेळासाठी आपली कात टाकून, आपल्या पूर्वकल्पना आणि पूर्वग्रहांच्या बाहेर पडून जगाचा आस्वाद घेण्याची अनुमती आपल्याला अनुवादात सापडते. त्यामुळे आपले जग व आपले मन हे असंख्य, अवर्णनीय मार्गांनी विस्तृत आणि सखोल होते," माझे विचार मी यापेक्षा अधिक अचूकपणे मांडू शकत नाही. कमी प्रचलित असलेल्या भाषा आणि संस्कृतींसाठी, साहित्यिक भाषांतर हे निर्वसाहतीकरणाच्या प्रक्रियेतलं एक मोलाचं साधन आहे असा माझा ठाम विश्वास आहे. जेव्हा आपण ऐतिहासिकदृष्ट्या कमी प्रचलित असलेल्या आणि/किंवा उपेक्षित भाषा आणि संस्कृतींमधून भाषांतर करतो, तेव्हा आपण ती भाषा किंवा संस्कृती अधिक लोकांपर्यंत पोचवून त्यामधील कथा आणि दृष्टिकोन हरवणार नाहीत किंवा त्यांचा चुकीचा अर्थ लावला जाणार नाही याची खात्री करत ती भाषा संस्कृती जिवंत ठेवण्याच्या कार्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतो.
तुम्ही एका लोकप्रिय मराठी रॅप गाण्यासह वेगवेगळ्या भाषांमधील गाण्यांचे बोल अनुवादीत केले आहेत. गाण्याच्या बोलांचा अनुवाद करण्याच्या तुमच्या दृष्टिकोनाबद्दल आणि प्रत्येक अनुवादाच्या उद्देशानुसार कवितांचा अनुवाद करताना वापराव्या लागणार्या वेगळ्या दृष्टिकोनाबद्दल अधिक सांगू शकाल का?
अनुवादक म्हणून मला गाण्याचे बोल आणि कविता हे दोन्ही प्रकार आनंददायी तसेच आव्हानात्मक वाटतात. जेव्हा गाण्याच्या बोलांचा विचार केला जातो तेव्हा माध्यम आणि हेतू अशा गोष्टीदेखील विचारात घ्याव्या लागतात. तुम्ही व्हिडिओच्या उपशीर्षकासाठी अनुवाद करत आहात, की तुम्हाला विशिष्ट ओळींमधील काव्य जपून ठेवायचे आहे, की तुम्ही शब्दशः भाषांतर करण्याचा प्रयत्न करत आहात? अशा अनेक प्रश्नांनुसार अनुवाद वेगवेगळा होईल. कवितेपेक्षा गाण्यांचे बोल अनेक अंगांनी वेगळे ठरतात. जेव्हा तुम्ही एखादं गाणं ऐकता किंवा गाण्याचा व्हिडिओ पाहता तेव्हा गाण्याच्या बोलांना निश्चितच अधिक संदर्भ असतो; कवितेपेक्षा हे वेगळे ठरते. म्हणून, जेव्हा मी बोलांचे भाषांतर करते तेव्हा मी ते खूप बोजड किंवा अति शब्दशः होणार नाहीत याची काळजी घेते. मात्र याचा अर्थ असा नाही की कवितेच्या अनुवादाची प्रक्रिया याच्या उलट असते. कवितेच्या अनुवादाची प्रक्रिया मला थोडी अधिक वेळ घेणारी वाटते. कवितेबाबत मला वाटतं की, ती थोडी दीर्घ अशी प्रक्रिया आहे जिथे मी मूळ लय आणि भावना अनुवादातही टिकून राहील असा प्रयत्न करते.
आम्ही आतापर्यंत मुलाखत घेतलेल्या अनुवादकांपैकी तुमच्याकडे सिनेमातले संवाद आणि सबटाइटल यांचा अनुवाद करण्याचा वेगळा अनुभव आहे. या दोन्ही गोष्टीच्या अनुवादाची प्रक्रिया ही साहित्यिक अनुवादापेक्षा वेगळी आहे. या दोन प्रकारच्या लेखनाच्या अनुवादमधील फरकाबद्दल तुम्ही सांगू शकता का?
उत्तम प्रश्न. उपशीर्षकांमध्ये वेळ आणि जागेच्या अनेक मर्यादा असतात आणि साहित्यिक अनुवादापेक्षा त्याचा हेतू वेगळा असतो. शब्दशः अनुवाद न करता काही सेकंदांमध्ये , तुम्हाला पडद्यावरच्या संवादाचे सार व्यक्त करायचे असते. तुमच्या उपशीर्षकांमुळे चित्रपटाच्या अनुभूतीमध्ये भर पडली पाहिजे त्याने रसभंग होता काम नये. त्यांचा उद्देश हा सायकलवर चालवायला शिकताना लावल्या जाणार्या जास्तीच्या चाकांसारखा समजा. कधी कधी हे शब्द आणि संदर्भाच्या आल्यामुळे उपशीर्षक त्या ओझ्याखाली दाबले जाते. साहित्यिक भाषांतराच्या तुलनेत, उपशीर्षक तयार करताना वाक्यांची लय आणि वाक्यरचना यांवर अति भर देणे फायदेशीर नाही असे मला जाणवते. याचा अर्थ असा की म्हणजेच संवाद अचूक अनुवादित करण्यासाठी तुम्हाला शब्द आणि वाक्यरचना यांच्याशी खेळण्याचे स्वातंत्र्य असते. ही नवी वाक्यरचना संवादाशी पूर्णपणे जुळणे आवश्यक नाही. पण जेव्हा आपण साहित्यिक अनुवाद करत असतो, उदाहरणार्थ एखादी लघुकथा किंवा कादंबरी अनुवादित करायची असते, तेव्हा तुम्हाला तितके स्वातंत्र्य नसते. तिथे, अनुवाद हा एक पूर्णपणे वेगळा खेळ आहे. मला असं वाटतं की कागदासारख्या एका स्थिर माध्यमावरच्या लिखाणात लय आणि रचना अधिकठळकपणे उठून येतात.
अनुवादाचे, त्याच्या व्यवसायचे अनेक वेगवेगळे पैलू आहेत. तुमच्या मते, या क्षेत्रात अनुवादकांचा एकत्रित समुदाय असण्याचे महत्त्व काय आहे?
कोणत्याही प्रकारच्या लेखनाप्रमाणे, अनुवाद ही एक तीव्रतेने अंतर्मुख करणारी क्रिया आहे; पण त्यामध्ये एक सहयोगाची ठळक छटादेखील आहे. आपण जे काम करतो त्याचा मोठा भाग आपल्या मनात पार पडतो. आणि कधीकधी आपल्या मनातून बाहेर पडणे खूप महत्वाचे असते. इतर अनुवादकांशी संपर्क साधणे आणि आपण ज्यांच्याशी बोलू शकू असे लोक गोळा करणे खूप महत्वाचे असते. मराठीसारख्या कमी प्रचलित असलेल्या भाषांमधून अनुवाद करणाऱ्यांची संख्या फार मोठी नाही. अशा परिस्थितीत, ते अधिक अर्थपूर्ण ठरते. तुमच्या भाषांतरांवर तुम्हाला आवश्यक असलेला अभिप्राय देणे, साउंडिंग बोर्ड आणि सहयोगी असणे याव्यतिरिक्त, तुम्हाला स्वतःला स्थिर आणि सजग राहण्यासाठी इतर लोकांची, समूहाची आवश्यकता असते. मला असे लोक भेटले याचा मला आनंद आहे आणि त्यांच्या सोबतीबद्दल आणि पाठिंब्याबद्दल मी ऋणी आहे.
तुम्ही अनेक भाषांमधील वाक्ये, वाक्प्रचार आणि म्हणींचे भाषांतर केले आहे. मजकूराचे भाषांतर करताना तुम्ही तुमच्या वाचकांबद्दल काही गृहीत धरता का? भाषांतरित भाषेत मजकूर अधिक "सुलभ" करणे हे तुमचे भाषांतराचे एक उद्दिष्ट असते का?
मी भाषांतर करण्यास सुरुवात करण्याचे एक कारण म्हणजे मला इतरांना माझ्या संस्कृतीत सहभागी करून घ्यायचे होते. त्या अर्थाने, हो, अनुवादित भाषेत मजकूर "सुलभ" करणे हे माझ्यासाठी एक महत्वाचे उद्दिष्ट आहे; पण यासाठी लेखकाच्या दृष्टिकोनाची आणि विशिष्ट शैलीची किंमत मोजणे मला मंजूर नाही. फक्त काहीतरी अधिक "सुलभ" करण्यासाठी मी क्लिष्ट गोष्टींना बाळबोध करू इच्छित नाही. भाषांतरातील मजकुराचा स्वाद टिकवून ठेवण्यासाठी मी काय टिकवून ठेवायचे किंवा काय सोडून द्यायचे हे अनुवादक म्हणून मी घेत असलेल्या निवडींवर अवलंबून असते.
तुम्ही पूर्ण केलेले भाषांतर 'चांगले' किंवा 'पूर्ण' कधी मानता?
उत्तर द्यायला खूप कठीण, कदाचित अशक्य असा प्रश्न आहे हा! मी एक गोष्ट सांगू इच्छिते: २०२३ च्या सुरुवातीला मला 'टॉम्ब ऑफ सँड' च्या बुकर पारितोषिक विजेत्या अनुवादिका डेझी रॉकवेल यांना भेटायला मिळाले होते. तेव्हा त्यांनी जे सांगितले त्याबद्दल मी आजही वारंवार बोलत असते: "मूळ मजकूर सोडून द्यायला शिकणे महत्वाचे आहे. आणि मूळ कलाकृतीमध्ये जे सौंदर्य तुम्ही पहिले ते पेलवयास नवीन भाषा समर्थ आहे हा विश्वास तुम्हाला असणे महत्वाचे आहे”. मला असं वाटत की मी जेव्हा अशा स्थितीला पोहोचते की मी मूळ मजकुराला सोडून देऊ शकते आणि माझ्या अनुवादाकडे एक स्वतंत्र निर्मिती म्हणून बघते तेव्हा मी ते परिपूर्ण आहे असे म्हणू शकते. पण तरीही, भाषांतर काही दगडात रचलेले नसते; कालांतराने ते नेहमीच विकसित होते असते. म्हणून अजूनही परिस्थिती सोपी नाही.
तुम्ही वाचलेले आणि तुम्हाला आवडलेले काही अनुवाद कोणते आहेत?
हासुद्धा माझ्यासाठी कठीण प्रश्न आहे, कारण अनेक अनुवाद माझ्या आवडीचे आहेत! बी. जयमोहन यांचे ‘स्टोरीज ऑफ द ट्रू’ हे पुस्तक तामिळमधून प्रियंवदा रामकुमार यांनी अनुवादित केले आहे, हे एक उत्तम भाषांतर आहे; मला प्रियंवदा यांनी वापरलेली वाक्य रचना आणि शब्दांची निवड खूप आवडते. शांता गोखले यांचे साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ या अभिजात मराठी पुस्तकाचे भाषांतर देखीलआणखी एक आवडलेले आहे कारण ते इतके उबदार घरगुती पणाची उब असलेले वाचन आहे. मी अलीकडेच जयश्री कलाथिल यांनी मल्याळममधून अनुवादित केलेले शीला टॉमी यांचे ‘वल्ली’ वाचले; किती अद्भुत पुस्तक आहे.
अलिकडे, ग्लोबल साउथमधील लेखक स्पष्टीकरण, तिर्यकीकरण किंवा भाषांतराशिवाय इंग्रजी लेखनात त्यांची मूळ भाषा समाविष्ट करून त्यांची द्विभाषिक ओळख असल्याचा दावा करत आहेत. हे लक्षात घेता, तुम्ही किंवा तुम्ही द्विभाषिक साहित्याच्या अनुवादाकडे कसे पहाल?
अतिस्पष्टीकरण आणि अतिसरलीकरण भाषांतरात भर घालण्याऐवजी त्याचे खच्चीकरण करेल. पण याचबरोबर, मला वाटते की द्विभाषिक मजकुराचा विचार करताना संतुलन राखणे महत्वाचे आहे. तुम्हाला वाचकाला एका नवीन जगात आणि सांस्कृतिक संदर्भात न्हाऊन काढण्याची इच्छा आहे, पण त्याच वेळी त्यांना गोंधळात टाकून चालत नाही. आपल्या स्वतःच्या भाषेतील शब्द इंग्रजीसोबत येतात म्हणून ते तिर्यक (italicization) केल्यामुळे खूप मोठे नुकसान होत आहे - आपली भाषा काहीतरी परकी असल्यासारखे ते शब्द बाह्य बनवू नये. कधीकधी आपण आपल्या वाचकांना खरोखरच कमी लेखतो: आपल्याला वाटते त्यापेक्षा त्यांना खूप जास्त समजत असते. मला वाटते की जर मी अशा प्रकारच्या मजकुराचे भाषांतर केले असते तर मी काही मराठी वाक्ये तशीच ठेवली असती.
आपल्या मराठी-इंग्रजी द्विभाषिकतेशी तुम्ही कसे जुळवून घेता आणि तुमच्या भाषांतरांवर त्याचा कसा परिणाम होतो?
दक्षिण आशियाई भाषांच्या भाषांतर पदानुक्रमात मराठी ही एक कमी प्रतिनिधित्व असलेली भाषा आहे: दरवर्षी फक्त काही शीर्षके प्रकाशित होतात. साहित्यिक पुरस्कारांच्या दीर्घ यादीत तर याहीपेक्षा कमी लोक येतात, जिंकणे तर दूरच. एक दिवस ही दरी भरून काढण्याचे आणि भाषा आणि संस्कृतीची लोकमाध्यमांमधील सध्याची असलेली प्रतिमा बदलण्याचे स्वप्न मी पहाते. माझ्या संस्कृतीला व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि संपूर्ण मराठी अनुवादांमध्ये योगदान देण्यासाठी मी माझ्या द्विभाषिकतेला एक मोठा फायदा मानते. मी मुंबईतील एका उच्च मध्यमवर्गीय मराठी भाषिक कुटुंबात वाढले आणि माझे शिक्षण इंग्रजी माध्यमामध्ये झाले. मी खूप लहानपणापासूनच इंग्रजीमध्ये उत्साहाने वाचन करत आहे. तथापि, मी बारा किंवा तेरा वर्षांची होईपर्यंत मराठी वाचण्यास सुरुवात केली नाही - मी केवळ शाळेतच, शैक्षणिकदृष्ट्या भाषेचा अभ्यास केला. सुमारे चार वर्षांपूर्वी जेव्हा मी भाषांतर करण्यास सुरुवात केली तेव्हाच मला मराठी साहित्याचा पुन्हा शोध लागला. खरे सांगायचे तर, तो शोध अजूनही चालू आहे. इंग्रजीमध्ये अनुवाद करण्यामुळेच मला मराठी अधिक उमजू आणि समजू लागले आणि त्यामुळेच मी दुसऱ्यांसाठी ते संदर्भाच्या चौकटीत ठेवण्यासाठी सक्षम झाले.

उमा शिरोडकर या लेखिका व अनुवादक असून सध्या ‘द बॉम्बे लिटररी मॅगझिन’मध्ये सहकारी अनुवाद संपादक (फिक्शन) म्हणून कार्यरत आहेत. उमा यांचा जन्म मुंबईतला आहे आणि त्या प्रामुख्याने मराठीतून इंग्रजीमध्ये भाषांतर करतात. गुजराती आणि हिंदी भाषांमध्येही त्या काम करतात. २०२४ मध्ये, त्यांनी अहमदाबाद विद्यापीठातून भाषांतर आणि सर्जनशील लेखनात पदवी प्राप्त केली. त्या ‘@lyricallyobscure’ (‘लिरिकली ऑब्स्क्युअर’) नावाच्या त्यांच्या इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मवर भाषांतरित मराठी संस्कृती, साहित्य, चित्रपट आणि संगीत याबद्दल लिहितात.
Comments