top of page

‘स्त्री’साठीचा समानार्थी शब्द म्हणजे ‘अरण्य’

  • Writer: bilorijournal
    bilorijournal
  • Oct 23, 2022
  • 8 min read

सुनील गंगोपाध्याय ह्यांच्या 'अरण्येर दिन रात्री'चे पर्यावर्णीय स्त्रीवादी दृष्टिकोनातून वाचन


मूळ लेखिका – साक्षी नाडकर्णी

मराठी अनुवाद – आर्यायशोदा कुलकर्णी




स्त्री-पुरुष, ग्रामीण-शहरी, परदेशी-स्थानिक, पौर्वात्त्य-पाश्चिमात्य, संस्कृती-निसर्ग आणि अशाच अनेक पद्धतीने आपल्या विश्वाचे विभाजन केले गेले जाते. पण ह्या विभाजनातून शेवटी एका बाजूचा दुसर्‍या बाजूवर वर्चस्व दाखवण्याचा हेतु समोर येतो. तसं बघायला गेलं तर हे विभाजन, ह्या सीमा, पुसट असतात, सत्य परिस्थिती कायमच अस्पष्ट असते आणि सृष्टीला सगळ्या गोष्टी विशिष्ट भागांमध्ये आटोपशीरपणे मांडणे पटत नाही. ‘लिंग’ ह्या शब्दाची व्याख्या आणि त्याची व्याप्ती, तसेच निसर्ग व माणसातल्या नात्यातील अनेकविध अनोळखी पैलू लक्षात घेतले तर ते विभाजन गळून पडते. स्त्रिया आणि निसर्ग ह्यांमधे एक अंगभूत नाते असते. म्हणूनच पुरुषांनी स्त्रियांवर केलेली कुरघोडी आणि माणसाने निसर्गावर केलेली कुरघोडी ह्या दोन संकल्पनांमधे साम्य आहे असे पर्यावर्णीय स्त्रीवाद/ईकोफेमीनिझम सांगतो. ईकोफेमीनिझमची मूळ तत्त्वे गुंतागुंतीची आहेत. ह्या संकल्पना लक्षात घेता, सुनील गंगोपाध्याय ह्यांनी लिहिलेली अरण्येर दिन रात्री ही कादंबरी, स्त्रीवादी आणि उत्तर-वसाहतवादामार्फत असलेले पर्यावरणवादी विवेचन करण्यासाठीची जणू एक प्रयोगशाळाच वाटते. ह्या रोमांचक आणि रोचक गोष्टीमध्ये चार तरुण शहरी आणि औद्योगिक कलकत्त्याहून पलामूच्या निसर्गरम्य अरण्यात फिरायला जातात. आशिम, संजोय, शेखर आणि रोबीच्या एरवीच्या सुसंस्कृत जीवनापेक्षा भिन्न असे हे अरण्य एका पुनर्हस्तलिखितासारखे वाटते. कारण त्याद्वारे आपण निसर्ग आणि माणूस, तसेच आदिवासी स्त्रिया आणि वसाहतवादी शहरातून आलेल्या पुरुषांमधला परस्परसंवाद नव्या दृष्टीकोनातून पाहू शकतो व अधिक स्पष्टपणे समजू शकतो. अशा पार्श्वभूमीवर, कथेच्या शेवटी अरण्यातल्या आदिवासी स्त्रियांनी त्या शहरी नायकांवर आपले वर्चस्व सिद्ध केलेले दिसते. हे निसर्गाने माणसावर अंततः आपले आधिपत्य स्थापन करण्यासारखे आहे हे मी ह्या लेखातून मांडू इछिते. मी ह्या संकल्पनेचे, उदाहरणासह विवेचन करण्याचा प्रयत्न केला आहे. कथेच्या चार नायकांमधे तीन गोष्टी सारख्या आहेत----ते पुरुष आहेत, ते कलकत्त्यात राहतात आणि ते मानवजातीच्या चांगल्या तसेच वाईट गुणांचे द्योतक असतात. त्यांच्या आजूबाजूला असलेल्या लोकांवर आणि जागेवर सतत वर्चस्व दाखवण्याच्या त्यांच्या वृत्तीतून हे स्पष्टपणे दिसते. प्रत्येक नायकाची एक मानसिक स्थिती आहे- रोबीचा हृदयभंग झालेला असतो, संजोयचा त्याच्या व्यावसायिक मूल्यांशी समेट घडत नसतो, आशिम अपराधीपणाच्या भावनेत बुडलेला असतो, आणि स्वत:च्या भूतकाळाने पछाडलेला शेखर उदासीन झालेला असतो. अशा भावनिक पार्श्वभूमीवर, ह्या चार नायकांच्या वागणुकीचे ईकोफेमीनिस्ट दृष्टिकोनातून विवेचन करण्याची संधी ह्या कथेद्वारे आपल्याला मिळते. अगदी सुरुवातीपासूनच, त्या चौघांच्या वागणुकीतून त्यांच्या आजूबाजूच्या जागेवर आधिपत्य सिद्ध करण्याचा हेतु वाचकांसमोर येतो. हे अरण्य एक जिवंत आणि बहुदा धोकादायक ठिकाण आहे हे लक्षात न घेता ते ह्या जागेला एखाद्या पाश्चिमात्य सिनेमात दिसणार्‍या, केवळ माणसाच्या मौजेसाठी तयार केलेल्या ठिकाणासारखे समजतात (गंगोपाध्याय 20). पण तिथल्या आदिवासी लोकांच्या, विशेषत: स्त्रियांच्या, तथाकथित पाश्चिमात्य गुणांबद्दल बोलताना मात्र, ते स्वत:चे वर्चस्व सोडत नाहीत. हे चौघं स्वतः त्या अरण्यात घुसखोरी करत असूनही, तिथल्या स्थानिकांवर हुकूम गाजवतात आणि ते आपल्यापेक्षा कमी दर्जाचे आहेत हे आपल्या कृतीतून सतत दाखवत राहतात.


रोबीकडे “9 इंच लांब, धारदार आणि चकचकीत हत्यार” --- एक चाकू असतो" (गंगोपाध्याय 17). हयातून त्या चौघांच्या आजूबाजूच्या जागेवर आधिपत्य गाजवण्याच्या वृत्तीची व्याप्ती लक्षात येते. स्थानिक लोकांना फसवून ते एका बंगल्यात घुसतात आणि मग तिथल्या स्त्रियांना त्या बंगल्यात प्रवेश निषिद्ध करतात. बंगल्याची काळजी घेणार्‍या लोकांना ते सेवकांसारखे वागवू लागतात व त्यांच्यावर अरेरावीही करतात. तिथल्या स्त्रिया फक्त वस्तूवत आहेत असे मानून त्यांच्याशी वारंवार असभ्य वागणूक करतात. त्यांची ही अपमानास्पद वागणूक अगदी सुरुवातीपासून आपल्यासमोर येते, जेव्हा ते एका जाहिरातीत दिसणार्‍या बाईवर थुंकायचा प्रयत्न करतात. पण त्यांचा नेम चुकतो. ह्या प्रसंगातून, पुढे जाऊन अरण्यातल्या स्त्रियांवर आपले वर्चस्व गाजवण्याच्या त्या चौघांचा प्रयत्न असफल होणार, ह्याचे सुतोवाच गंगोपाध्याय अतिशय हुशारीने करतात. पलामूच्या जंगलातल्या आदिवासी स्त्रियांबद्दल नायकांची द्विधामनस्थिती असते. एका बाजूला त्यांना ह्या स्त्रिया आकर्षक वाटतात आणि त्याच वेळी त्यांच्याबद्दल तिरस्कारही वाटतो. त्या चौघांना ह्या स्त्रिया इतपत मादक वाटतात की जेव्हा दुली (एक आदिवासी स्त्री) काम मागायला त्यांच्याकडे येते तेव्हा रोबी तिच्यावर मोहून जातो आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतो. “त्या सगळ्यांशी शरीरसंबंध ठेवीन मी” (गंगोपाध्याय 58) असंही तो म्हणतो. पण बाकीच्या तिघांना ते रुचत नाही आणि अवघडल्यासारखं होतं. शेखर सोडला तर उरलेल्यांना असं बोलणं लैंगिक शोषण आहे असं वाटत नाही, कारण “भुकेला नैतिकता नसते” (गंगोपाध्याय 62). पण जेव्हा त्याच स्त्रिया काम मागायला ह्यांच्याकडे येतात तेव्हा मात्र हे चौघं त्या ‘उपद्रवी’ आहेत म्हणून त्यांना बंगल्यात येऊ देत नाहीत. जेव्हा एक मोहकपणे नाचणारी स्त्री आशिमला ‘दे’ असं सांगते तेव्हा मात्र तो चिडतो. कारण नाचणारी बाई त्याला आज्ञा देतेच कशी! एवढंच नाही तर, त्याचा मित्र त्याला शांत करण्यासाठी ती ‘खराब’ आहे असे सांगून तिच्याकडे दुर्लक्ष करायला सांगतो. गंमत म्हणजे, त्या आदिवासी स्त्रिया जेव्हा ह्यांना नकार देतात तेव्हा मात्र त्या लगेच “भांडायला तयार” असलेल्या “तिखट जि‍भेच्या” “गोचीडी” होतात (गंगोपाध्याय 6). नायकांच्या दृष्टीत, त्यांना स्वत:च्या अशा शारीरिक, आर्थिक, भावनिक किंवा नैतिक गरजा नसून, त्या स्त्रिया केवळ शारीरिक समाधानासाठीच्या वस्तुंसारख्या असतात. आपल्या नायकांची आदिवासी स्त्रियांबद्दल असणारी आणि एकूणच पितृसत्ताक समाजातली स्त्रियांना झटकून टाकण्याची वृत्ती इथे दिसते.


गंगोपाध्यायांच्या लिखाणाचे कौतुक असे की त्या परिस्थितीतही आदिवासी स्त्रिया ह्या बाहेरून आलेल्या पुरुषांना त्यांच्यावर वर्चस्व गाजवू देणार्‍या, निर्णयक्षमता नसलेल्या, केविलवाण्या अशा दाखवलेल्या नाहीत. ह्या तथाकथित श्रेष्ठ असणार्‍या पुरुषांशी असणारे त्यांचे परस्परसंवाद अतिशय प्रामाणिक असतात आणि त्यांचा स्वत:च्या गरजांवर ताबा असतो. त्या पुरुषांसोबत बसून दारू पितात, अपरिचित लोकांकडे बघून हसतात आणि बाहेरून आलेल्या, शहरी लोकांबरोबर शारीरिक संबंधाची मागणी करतात आणि ते ठेवतातही. कथेचे नायक ह्या आदिवासी स्त्रियांना म्हणूनच गोऱ्या, पाश्चिमात्य स्त्रियांची उपमा देतात कारण त्या मोकळेपणाने पुरुषांबरोबर बसतात, गप्पा मारतात. त्याच्यामते, जंगलातल्या जीवनपद्धतीने त्यांची बायकी विनम्रता काढून टाकली आहे, आणि “नखरेल शहरी मुलीं”सारख्या त्या नाहीत कारण “त्यांना काय हवंय हे त्यांना माहिती आहे आणि त्यांच्या गरजांबाबत त्या अगदी स्पष्टपणे बोलतात” (गंगोपाध्याय 83). त्यांच्या “भावना’ ह्या त्यांच्या “शरीरां”सारख्याच पारदर्शक आहेत. त्या जरी “हमालांसारख्या कामं” करत असल्या तरी त्यांचं “हास्य मात्र राणी समान” आहे (गंगोपाध्याय 35) हे आपल्या नायकांनाही मान्य करावं लागतं. त्या नाचणाऱ्या बाईचंच उदाहरण घेतलं तर, तिच्या त्या मादक नृत्यातूनही ती काली मातेची शक्ती आणि तिचा तो विस्मयकारक अवतार धारण करते. जेव्हा दुली चौदा रूपयांच्या बदल्यात रोबीशी शारीरिक संबंध ठेवायला तयार होते तेव्हा रोबीला असं वाटतं की त्याच्याकडे पैसा आहे म्हणून तो तिच्यावर नियंत्रण ठेवू शकत आहे. पण खरा ताबा हा दुलीचा रोबीवर असतो, ज्या वाटे ती तिला हवे ते पैसेही मिळवते आणि तिच्या शारीरिक गरजाही भागवते. ह्या प्रसंगातून त्या आदिवासी स्त्रियांकडे असलेली निर्णयक्षमता दिसते. शहरातली, समंजस अशी कुठलीही मुलगी जे करू शकणार नाही (गंगोपाध्याय 137) त्या रोबीच्या “आदिम, प्राथमिक प्रवृत्ती” ला संतुष्ट करून, दुली त्याच्यावर संपूर्णपणे ताबा मिळवते. जेव्हा लाक्का (ज्याला कथेच्या नायिकांनी आधी मारहाण केलेली असते असा एक आदिवासी माणूस) आणि त्याच्याबरोबर आलेल्या संथाली लोकांचा जमाव रोबीला त्यांच्यातल्या बाईशी गैरव्यवहार केल्यासाठी बुकलून काढतो, तेव्हा ह्या ताब्याचा विळखा अधिक घट्ट होतो. उत्तरवसाहतवाद आणि लिंगवादी दृष्टिकोनातून बघता, ह्या प्रसंगात, त्यांच्यावर केल्या जाणाऱ्या अन्यायाविरूद्ध लढण्याच्या उपेक्षित समाजाचा प्रयत्न सफल होताना दिसतो.


आपल्या आजूबाजूच्या जागेवर आपले वर्चस्व निर्माण करणे हा ह्या चार तरुणांचा हेतु आहे हे आत्तापर्यंतच्या कथेनुसार प्रस्थापित होते. आता आपण तिथल्या परिसराच्या व्याख्येत तिथला निसर्गही समाविष्ट करूया. गंगोपाध्याय ह्या निसर्गाचा उत्कृष्ट वापर करून कथेला त्या जागेत घट्ट रोवतात. त्या चार नायकांनी कलकात्याहून पलामूच्या जंगलात केलेले स्थलांतर ही कृती संपूर्ण गोष्टीची सुरुवात करून देते आणि त्या कथेचा आधारही ठरते. हे स्थलांतर गंगोपाध्यायांच्या मते एक प्रकारचे पलायन आहे. शहरातल्या राहण्याने त्यांच्याकडून हिरावून घेतलेली शांती पलामूच्या अरण्यात त्या चौघांना पुन्हा एकदा सापडेल अशी आशा त्या पलायनात दडलेली आहे. कलकात्यात असताना प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या प्रश्नाशी - आर्थिक, भावनिक, कौटुंबिक, सामाजिक, लढा देताना दाखवलेला आहे आणि पलामूच्या त्या अरण्यात प्रवेश करताना एक ‘’भाबडा आशावाद’’ त्या चौघांमध्ये दिसतो असे अनुवादिका त्यांच्या टिपांमद्धे लिहितात (रे xi). त्यांच्या शहरी अडचणींसमोर सारे फिके पडते आणि म्हणून अरण्यात राहताना येणार्‍या अडचणींचा त्या चौघांना अंदाज येत नाही. जंगलात जाताना त्यांना ‘’एका आश्चर्यकारक अनुभवाच्या उंबरठ्यावर उभे असल्याची’’ भावना येते (गंगोपाध्याय 11). दैनंदिन जीवनातल्या चढ-उतारांमधून सुटका मिळवण्यासाठी हे तरुण अरण्याकडे झेप घेतात आणि त्यांचा त्या अरण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, एक धोकादायक जागा असा नसून एक ‘’सुंदर बाग’’ किंवा ‘’मजा करायला जायची उत्तम जागा’’ असा असतो (गंगोपाध्याय 19,36). त्यांच्यासाठी अरण्यात जाण्याचे मुख्य आकर्षण म्हणजे तिथे असणारं रहस्यमय वातावरण नाही, तर तिथे मिळणारे साधे सोपे आयुष्य हे असते. मद्यपान आणि स्त्रियांची सांगत हयात मिळणाऱा सोपा, नैसर्गिक आनंद आणि जंगलातला निवास हे त्यांच्या लेखी एकच असतात (गंगोपाध्याय 29). एक क्षण असाही येतो जेव्हा त्या चौघांना जंगलात राहायची इतकी सवय झालेली असते की ते सगळे कपडे काढून टाकतात आणि ‘’रात्री जंगलात अनावश्यक वाटणाऱ्या अशा गोष्टी’’ झटकून टाकतात (गंगोपाध्याय 76). ह्या सगळ्या प्रसंगांमधून हे सिद्ध होतं की नायकांना त्यांच्या आजूबाजूच्या जागेवर नियंत्रण मिळवायचे आहे. जंगलाचे वर्णन करताना गंगोपाध्याय घनदाट झाडीचे किंवा जंगली प्राण्याचे उल्लेख करत नाहीत तर मल्लिका, पोर्टुलाका, आंबा, झेंडू, स्थानिक मीमीठी अशा फुला-फळांचा उल्लेख करतात. त्यांच्या आजूबाजूच्या निसर्गाचे वर्णन कायम नायकांना आनंद देणार्‍या, मनुष्याला उपयोगी पडणार्‍या अशा पद्धतीनेच केले गेले आहे. कथेमध्ये ज्या प्राण्यांचा उल्लेख केला गेला आहे, ते खारी, मैना, गोम आणि किडे हे प्राणीदेखील गोंडस आणि छोटे आहेत. निसर्गाच्या विध्वंसक शक्तीचे रूप असणारे वणवे, जंगली प्राणी किंवा एखाद्याला काबीज करणारे वेल आणि झाडं ह्यांचा उल्लेखही कुठे नाही. किंबहुना, ते अरण्य “रानटी तण, काटेरी झुडुपं आणि अकराळविकराळ वेल विरहित” असल्याचे दाखवले गेले आहे (गंगोपाध्याय 19). जंगलाचे असे वर्णन कथेत केलेले आहे कारण ही कथा त्या चार तरुणांच्या दृष्टिकोनातून लिहिलेली आहे. त्यांच्या मते ते अरण्य हे नैसर्गिक शक्ती असलेली जागा नसून, त्यांच्या आनंदासाठी असलेली सुंदर अशी एक जागा आहे. त्यांच्या कल्पनेतलं अरण्य हे शहरातल्या कटकटींपासून विश्रांती घेण्याची जागा आहे, जिथली लोकं आणि जागा ही सर्वस्वी त्यांच्या सेवेला हजर आहे. सुरुवातीच्या वसाहतकारांनी त्यांनी ‘शोधून काढलेल्या’ जागांबद्दलचे मत आणि हे चार तरुण त्या अरण्याकडे ज्या नजरेनी बघतात त्यात बरेच साम्य आहे - तिथल्या स्थानिक रहिवाशांचा आणि पर्यावरणाचा आदर न करता त्या जागेची आर्थिक आणि मनोरंजक क्षमता पाहून त्यावर अधिराज्य गाजवणे.


कथेच्या नायकांनी त्यांच्या आजूबाजूच्या आदिवासी स्त्रिया आणि निसर्गावर नियंत्रण मिळवण्याचा केलेला प्रयत्न आणि त्याला केला गेलेला विरोध ह्या बद्दल मी आधी बोलले आहे. स्त्रियांवर केली जाणारी दडपशाही आणि निसर्गावर केली जाणारी दडपशाही हे एकमेकांशी जोडलेले आहेत ह्या ईकोफेमीनिझमच्या तत्वांशी मी सहमत आहे. निसर्ग आणि स्त्रिया हे दोन्ही पुरुषांकडून "इतर" म्हणून पहिले जातात, ज्यामुळे वास्तवात पुरुषांपेक्षा स्त्रिया ह्या भौगिलिक तसेच आध्यात्मिक दृष्ट्या निसर्गाशी अधिक जोडलेल्या असतात (सीमोन द बोव्हार, 112). हेगेलीयन विचारपद्धतीनुसार विवेचन केले तर, नायकांकडून आदिवासी स्त्रियांवर दाखवले जाणारे वर्चस्व म्हणजे निसर्गावर वर्चस्व दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असे म्हणता येईल. आदिवासी स्त्रिया आणि तिथल्या निसर्गाशी असणारा त्यांचा समतोल गंगोपाध्याय अनेक पद्धतीने दाखवतात. ह्या स्त्रियांना जंगलाच्या कानाकोपऱ्याची ओळख असते – रोबीला शौचासाठी जायचे असते तेव्हा दुली त्याला “साप आणि नाग टाळत” जंगलातून घेऊन जाते, आणि रोबीला “त्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी नेत असलेल्या आंधळ्या माणसासारखं” वाटतं (गंगोपाध्याय 132,135). नंतर जेव्हा दुली आणि रोबी एकत्र झोपतात तेव्हा ते अत्तर आणि टाल्कम पावडरचा वास येणार्‍या शहरी मुलींबरोबर झोपण्यापेक्षा “वेगळं असतं”, कारण त्याच्या मते हे म्हणजे “जणू निसर्गाचेच रूप आहे” (गंगोपाध्याय 137). त्या आदिवासी स्त्रीसोबतच्या शारीरिक संबंधातून रोबीला “निर्मल, नैसर्गिक सुख” मिळतं (गंगोपाध्याय 137), कारण ती बाई स्वत: अतिशय नैसर्गिक आहे, खारट ओठ असलेली, तोंडाला आणि अंगाला वास येणारी अशी. ती सौंदर्य प्रसाधनं वापरत नाही, पण तिच्या आत्मविश्वासातून जणू निसर्गाची स्वत:शी असलेली एकनिष्ठता दिसते. जशा पलामूच्या जंगलातल्या बाकीच्या स्त्रिया त्या जंगलाचा हिस्सा बनतात, तशीच तीही आजूबाजूच्या निसर्गाचा एक भाग बनते. गंगोपाध्याय आदिवासी स्त्रियांचे वर्णन करताना म्हणतात की त्या निसर्गासारख्या चिरतरुण दिसतात, “पंधरा पासून पस्तीस वर्षांमध्ये कुठेही मोडतील अशा” (गंगोपाध्याय 33). त्यांना उथळ विनम्रतेची गरज भासत नाही आणि त्या “कंबरेपर्यंत काही न घालता” वावरतात. त्यांना मल-मुत्रासंबंधी केलेले उल्लेखानी फरक पडत नाही कारण त्यांना मानवी शरीराच्या नैसर्गिक क्रियांची लाज वाटत नाही. त्यांचं ऊन्हामुळे काळवंडलेलं शरीर आणि त्यांचं सौंदर्य नैसर्गिक आहे (गंगोपाध्याय 134). ते राहत असलेल्या राकट मातीसारखीच त्यांची तब्येतही राकट आहे. टोपल्या, झुळझुळीत कपडे आणि भातापासून बनवलेली दारू असलेली त्यांची जीवनशैली आजूबाजूच्या निसर्गाला न लुबाडता जगण्याची आहे. मादकपणे नाचणाऱ्या त्या बाईच्या “आवाजातसुद्धा एक रानटीपण” आहे जे तिच्या आजूबाजूच्या निसर्गात दिसतं (गंगोपाध्याय 67). पलामूमधले स्थानिक रहिवासी, विशेषतः स्त्रिया, त्यांच्या पर्यावरणवादी जीवनशैलीमुळे त्या निसर्गात मिसळून जातात. थोडक्यात सांगायचे तर, स्त्रिया आणि त्या रहात असलेले अरण्य एकच होऊन जाते. गंगोपाध्यायांच्या कथेत, आदिवासी स्त्रिया आणि त्यांच्या सभोवतालच्या अरण्यात एक अंगभूत लय असते, ती ह्या चार तरुणाच्या आगमनाने विस्कटते.


पण, सरतेशेवटी, पुन्हा एकदा समतोल निर्माण होतो. कथेच्या शेवटी, भावनिक आणि शारीरिक दृष्ट्‍या हरलेला रोबी आपल्यासमोर येतो- त्यांच्यातल्या एक स्त्रीसोबत शरीर संबंध ठेवून अव्यक्त नियम मोडल्यामुळे स्थानिकांकडून त्याला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण होते. हे घडत असताना त्याचे मित्र मात्र त्याच्या मदतीला येत नाहीत. ह्या मारहाणीला प्रत्युत्तर म्हणून “सारं जंगल जाळून टाकीन” (गंगोपाध्याय 172) असं म्हणणारा शेखर, अहंकार आणि स्वाभिमान दोन्ही गळून पडल्यामुळे असहाय्य होतो. त्याला मायावी वाटणारं फूलझाड शेवटी आपले “धारधार बोचणारे” काटे दाखवत त्यांना “भीती घालतं” (गंगोपाध्याय 171). हे सगळं घडत असताना, त्यांच्या आजूबाजूचा निसर्ग मात्र आनंदाने मार्गक्रमण करत असतो- मैना गातात, सुरवंट त्यांच्या वाटेनी जातात, खारी इकडे तिकडे बागडतात. अशाप्रकारे, त्या स्त्रिया दडपशाहीला बळी पडत नाहीत. चार नायक कलकात्याला पिटाळले जातात आणि अरण्य कोणताही अडथळा न येता बहरते. पितृसत्ताक पद्धतीच्या दडपशाहीचा स्पर्शही न झालेले अरण्यातील दिवस-रात्र, पुनः एकदा शांत आणि नि:शब्द होतात.



ग्रंथकोष

गंगोपाध्याय, सुनील. डेज अँड नाइटस् इन द फॉरेस्ट, अनुवाद राणी रे. पेंगविन बुक्स, 2010.

ड बोव्हार, सीमोन. द सेकंड सेक्स, अनुवाद कॉंस्टंस बोर्ड आणि शीला मलोव्नी-शेवालिये. विंटेज बुक्स, 2011.


मुंबईच्या सेंट. झेवियर्स महाविद्यालयातून बी. ए आर्टस् - साहित्याच्या शेवटच्या वर्षात साक्षी शिकत आहे. इंडिजीनस वेब, द मोनोग्राफ मॅगझीन, द अनकॉमन मॅगझीन आणि द इथाका मॅगझीन अश्या विविध मंचांवरनं तिचे लिखाण प्रसिद्ध झालेले आहे. पार्ट-टाइम लेखक आणि फूल-टाइम वाचक असणार्‍या साक्षीला कलेच्या वैश्विक बदल घडवून आणण्याच्या क्षमतेवर मनापासून विश्वास आहे. तिच्या पहिल्या वाहिल्या कादंबरीवर ती सध्या काम करते आहे.


Comments


bottom of page